शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. मात्र, अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना अडचणी येतात. यासाठी अग्निशमन विभागात १५० फायरमनची सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. शहरात झोपडपट्ट्यांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. मोठ्या संख्येने औद्योगिक तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या सुरू झाल्या आहेत. लोकसंख्येनुसार शहरामध्ये १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत. लोकसंख्या वाढत असताना अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अग्निशमन विभागात प्रशासकीय कामकाजामधील अधिकारी, कर्मचारी वगळता सहा लिडिंग फायरमन तर ३० फायरमन कार्यरत आहेत. भविष्यात पिंपरीत मध्यवर्ती केंद्रासह दहा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची आणखी गरज आहे.
