पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी बातमी! अकोल्यात ऑनर किलिंगमधून बापाने पोरालाच संपवलं

 पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अद्यापही जातीवरुन गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचे समोर येतय. अकोल्यातही मुलाने दुसऱ्या जातीतल्या मुलीसोबत प्रेम केल्याने त्याची जन्मदात्या बापानेच हत्या केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. यामध्ये मुलाच्या मोठ्या भावानेही वडिलांना साथ दिली. धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या हत्येला आत्महत्या दाखवण्याचाही प्रयत्न वडील आणि भावाने केला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करुन दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे.

अकोला जिल्ह्यातील टिटवा येथे घडलेल्या घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं आहे. आपल्या मुलानं दुसऱ्या जातीच्या मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरुन वडिलांनी मोठ्या मुलाच्या मदतीने पोटच्या मुलाला संपवल्याची घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. संदीप नागोराव गावंडे असं मृत तरुणाच नाव आहे. मारेकऱ्यांनी संदीपचे हात आणि पाय बांधून त्याने आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंती आरोपी बाप आणि मुलाला अटक केली आहे.

अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात नागोराव गावंडे हे त्याच्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. संदीपचे गावातील एका अनुसूचित जातीच्या कुटुंबातील मुलीवर प्रेम होते. दोघांनीनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचे प्रेमसंबंध संदीपच्या वडिलांना मान्य नव्हते. या कारणावरुन घरामध्ये देखील मोठा वाद झाला होता. त्यामुळे दोघांनी पळवून जाऊन लग्न करण्याचे ठरवलं.

संदीपच्या वडिलांना हा सगळा प्रकार कळाला. त्यामुळे नागोराव व संदीपमध्ये जोरदार वाद झाला. या दरम्यान नागोराव यांनी मोठ्या मुलाच्या मदतीने घरातच संदीपचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर संदीपचे हातपाय बांधून घराला कुलूप लावून सर्व बाहेरगावी निघून गेले. शुक्रवारी संध्याकाळी ते घरी परतले आणि माझ्या मुलाला कोणीतरी मारले, असा बनाव रचला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला.

पोलिसांना तपासादरम्यान संशय आल्याने त्यांनी नागोराव आणि त्यांच्या मोठ्या मुलाची चौकशी केली. चौकशीदरम्यान, दोघांनीही हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी वडील आणि संदीपचा मोठा भावाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *