शहापूरात मध्यान्ह भोजनातून १०९ विद्यार्थ्यांना विषबाधा; विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

शहापूर तालुक्यातील भातसई भागात संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेमधील १०९  विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. यामध्ये ४६ मुले आणि ६३ मुलींचा सामावेश आहे. बाधित विद्यार्थ्यांना शहापुरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

भातसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते १० वी इयत्तेत २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही आश्रमशाळा अनुदानित आहे. बुधवारी दुपारी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात पुलाव आणि गुलाबजाम हे अन्नपदार्थ देण्यात आले होते. हे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर १०९ विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांना तातडीने शहापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रसाद भंडारी यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार कोमल ठाकूर, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी तसेच आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी उपजिल्हारुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. दरम्यान, रुग्णालय परिसरात मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांचे कुटूंबिय आणि नातेवाईकांची गर्दी जमली होती. त्यामुळे दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *