मालाड पूर्व येथील नाल्यात सापडली चिमुरडी; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मालाड पूर्व येथील नवजाला पाडा येथील नाल्यात नवजात मुलगी सापडली. मुलीला महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरण अज्ञात पालकांविरोधात दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मालाड पूर्व येथील जीतेंद्र क्रॉस रोडवरील यादव तबेल्याच्या शेजारी असलेल्या नाल्यामध्ये शनिवारी एक बाळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या बाळाला नाल्यातून काढून जवळील म.वा. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत. ती मुलगी असून पालकत्त्व नाकारण्याच्या उद्धेशाने तिला नाल्यास फेकण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत एका दिवसांपूर्वीच मुलीचा जन्म झाल्याचा अंदाज असून याप्रकरणी अज्ञात पालकांविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार रमेश बोके यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३१७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करत असून नाला परिसरात कोणताही सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *