तव्यावर बसून समस्या सोडवणारा बाबा निघाला बलात्कारी; विवाहितेवर 90 दिवस करत होता अत्याचार

अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदासबाबा उर्फ सुनील कावलकर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुदासबाबानो मध्य प्रदेशातील एका महिलेवर तब्बल तीन महिने अत्याचार करून मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत बनवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांत गुरुदासबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी हा बाबा गरम तव्यावर बसून भक्तांच्या समस्या सोडवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पतीला व्यसनाधीनतेतून मुक्त करण्यासाठी जबलपूर येथील 34 वर्षीय महिला 2 मे 2023 रोजी बाबाच्या मार्डी येथील आश्रमात आली होती. पतीला व्यसनमुक्त करण्यासाठी पुढील काही महिने आश्रमातच मुक्कामी राहावे लागेल, असे बाबाने तिला सांगितले. त्यानंतर महिलेने आश्रमात राहण्याची तयारी दर्शवली. याचदरम्यान तीन महिन्यांपर्यंत भोंदूबाबाने तिच्यावर सतत अत्याचार करून लैंगिक शोषण केले. धक्कादायक बाब म्हणजे बाबाने महिलेला लग्नाचेही आमिष दाखवले होते.

कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी पीडित महिला आश्रमात राहत होती.  या काळात गुरुदासबाबाने महिलेने अंगाऱ्यासारखा पदार्थ दिला. तो अंगारा खाल्ल्यावर पीडित महिलेला गुंगी आली. त्यानंतर गुरुदासबाबाने महिलेचे लैंगिक शोषण केले. दुष्कृत्यानंतर एक दिवस महिलेला त्याच्या मोबाइलमध्ये त्याने केलेल्या कुकर्माचा व्हिडीओ दिसला. तिने जाब विचारला असता, गुरुदासबाबाने दमदाटी करून धमकावले. त्यानंतर 2 जानेवारीला तिला नागपूरला सोडून बाबा फरार झाला. त्यानंतर महिलेने बाबाविरोधात गुन्हा दाखल केला.

काही महिन्यांपूर्वी याच भोंदू सुनील कावलकरने गरम तव्यावर बसून लोकांच्या समस्या सोडवत असल्याचा व्हिडीओ जारी केला होता. त्याबाबत चौकशी होताच चारधामच्या बहाण्याने पसार झाला होता. यादरम्यान महिलेवर अत्याचार करून तो पुन्हा फरार झाला आहे. पहिल्या प्रकरणातच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुरुदासबाबावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हाच त्याच्या मार्डी आश्रमातून कुऱ्हा पोलिसांनी अटक का केली नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

“25 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यामध्ये एका 34 वर्षीय महिलेवर गुरुदासबाबावर बलात्काराचा आरोप केला आहे. आरोपी सध्या फरार आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. हे प्रकरण गंभीर आहे. आरोपीने अश्लिल व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे महिलेने म्हटलं आहे. हा व्हिडीओ कुठे व्हायरल होऊ नये म्हणून कारवाई केली जाणार आहे. आरोपी ताब्यात आल्यानंतर त्याच्यावर आधीपासून असलेल्या गुन्ह्याबाबतही कारवाई होणार आहे,” अशी माहिती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *