पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न जूनपर्यंत मिटला

राज्याच्या सर्व भागांत गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांशी प्रमाणात सुटण्यास मदत झाली असून, येत्या जूनपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आज व्यक्‍त केला.

परतीच्या पावसाने दिलासा दिला असून, टॅंकर आणि चारा छावण्यांची संख्याही कमी झाली आहे. खरीप पिकांचे नुकसान झाले असले, तरीही सध्या पडत असलेल्या पावसाने रब्बी पीक क्षेत्रात लक्षणीय वाढ होणार असल्याचा आशवादही त्यांनी या वेळी व्यक्‍त केला. जलयुक्त शिवार योजनेतील कामामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे चित्र असून, याबाबत काही दिवसांतच नेमका किती पाणीसाठा यातून उपलब्ध झाला असेल, याची माहिती मिळणार आहे, असेही ते मंत्रालयात म्हणाले.

फडणवीस यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसह सोलापूर, सातारा, सांगली, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीक-पाण्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. दुष्काळाचे सावट भेडसावणाऱ्या अनेक भागांतील चित्र स्पष्ट झाले आहे. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.
समाधानकारक पावसामुळे राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे पाणीसाठा आणि सिंचनक्षमतेत झालेल्या वाढीचा आढावा घेण्याच्या सूचना देऊन फडणवीस म्हणाले, “”पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन झाल्यास त्याचा रब्बी पिकासाठी फायदा होणार आहे. रब्बीखालील क्षेत्रात मोठी वाढ शक्‍य असून राज्यात जवळपास 70 लाख हेक्‍टरवर रब्बीची पिके घेतली जातील, असा अंदाज आहे. शासकीय यंत्रणेने त्या दृष्टीने नियोजन करावे. ज्या जिल्ह्यांत रब्बीची पिके घेतली जात नाहीत अशा जिल्ह्यांतही रब्बी पीक घेण्यासाठी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करावे.‘‘

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील संभाव्य पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत झाली आहे. बहुतांश जिल्ह्यांत जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा निर्माण झाला आहे, तर अवर्षणग्रस्त भागातील स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असून या भागातही मार्चपर्यंत पाणीटंचाई भेडसावणार नाही, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, “”या पावसाच्या पहिल्या टप्प्यात पाणी आणि चाऱ्याची स्थिती चांगल्याप्रकारे सुधारली आहे. जायकवाडी प्रकल्पातील साठा सव्वाचार टक्‍क्‍यांवरून सात टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. जालना जिल्ह्यातील गलाटी धरण प्रथमच 70 टक्के भरले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील टॅंकरची संख्या 143 वरून 64 इतकी कमी झाली आहे, तर जालना जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांतील जलसाठा 53 टक्के इतका वाढला असून लघुप्रकल्पांतही जलपातळी वाढू लागली आहे. बीड जिल्ह्याला या पावसाने मोठा दिलासा दिला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पातील साठा साडेतीन टक्‍क्‍यांवरून साडेतेरा टक्‍क्‍यांपर्यंत, तर लोअर दुधना प्रकल्पातील साठा 27 टक्‍क्‍यांवरून 55 टक्‍क्‍यांवर गेला आहे. विष्णुपुरी (जि. नांदेड) आणि माजलगाव (जि. बीड) या प्रकल्पांतही पातळी वाढू लागली आहे. इतर ठिकाणीही परिस्थितीत मोठा बदल होत आहे. अनेक ठिकाणी गुरांसाठी उघडलेल्या चारा छावण्या बंद होऊ लागल्या असून, पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टॅंकरची संख्याही कमी होत आहे. काही गावांत चाराटंचाई असली, तरी याच गावांच्या जिल्ह्यात इतरत्र उपलब्ध असणाऱ्या चाऱ्यामुळे बाहेरून चारा मागविण्याची वेळ येणार नाही. अजून परतीचा पाऊस बाकी असल्याने या परिस्थितीत अधिक सुधारणा होईल.‘‘

राज्यात अनेक गावांत जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून चांगली कामे झाल्याने या पावसामुळे या अभियानाला मोठे यश लाभल्याचे सिद्ध झाले आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, की विकेंद्रित जलसाठ्यामुळे शेतीचा शाश्वत विकास होऊ शकेल, असा विश्वास निर्माण झाला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांतील जलप्रकल्पांतील पाणीपातळी वाढू लागली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थितीचे सावट दूर झाले आहे.

नवीन जलस्रोत निर्माण करण्यापेक्षा जुन्या स्रोतांची दुरुस्ती व सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित केल्यास कमी खर्चात व कमी वेळेत चांगले काम होईल. तसेच स्वयंचलित हवामान केंद्रे लवकर सुरू व्हावीत यासाठी कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश त्यांनी या वेळी दिले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदतीचे वाटप करावे, वनहक्क कायद्यांतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर त्या शेतकऱ्याचे नाव नोंदवावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी या वेळी दिले.

टंचाईग्रस्त तालुक्‍यांना मदत
राज्यात गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसाने आशादायक चित्र निर्माण झाले असले, तरीही ज्या तालुक्‍यांत सध्या टंचाई भेडसावत आहे तेथे तसेच टंचाई निवारणासाठी शासनाने सुरू केलेल्या सर्व योजना पूर्ण क्षमतेने राबवण्यात येणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या पुढील काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याची अपेक्षा असली तरीही सरकार मदतीच्या उपाययोजनांबाबत हात आखडता घेणार नाही. त्या सुरूच राहतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन झाल्यास त्याचा रब्बी पिकासाठी फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *