शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्रामध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकण्याचे प्रकार शहरात सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे नदी पात्र अरूंद होत आहेत. राडारोडा टाकणारी सहा ट्रक व टेम्पो महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने जप्त केले. त्यांच्याकडून ६५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातून वाहणार्या तीनही नदी पात्रात राडारोडा व मातीचा भराव टाकून सपाटीकरण केले जाते. तेथे अनधिकृत बांधकाम किंवा पत्राशेड बांधून ते भांड्याने देणे किंवा विकले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र, या प्रकाराकडे महापालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नदीकाठी राडारोडा टाकण्याचे प्रकार सर्वत्र वाढले आहेत.
तक्रार केल्यानंतर महापालिकेचा क्षेत्रीय कार्यालय तसेच, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग जागे झाल्याचे ढोंग करीत कारवाई करते. कारवाईनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती सुरू होते.या लोकांवर कायमस्वरूपी कारवाई करून त्यांना निर्बंध लादण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
पिंपळे गुरव येथील मोरया पार्क, कृष्णराज कॉलनी, अमृता कॉलनी, भाऊ नगर, मुक्तांगण लॉन्स, देवकर पार्क, शिवनेरी कॉलनी या भागांतून दररोज ट्रक, ट्रक्टर, डम्पर, टेम्पोतून राडारोडा नदी काठी टाकला जात आहे. त्या बाबतची तक्रार पर्यावरण विभागास प्राप्त झाली. त्यानंतर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून त्या वाहनचालकांवर कारवाई केली.
