लालबाग येथील शाळेच्या पुनर्बांधणीला मुहूर्त मिळेना

लालबाग येथील प्रभाग क्रमांक २०४ मधील साईबाबा म्युनिसिपल स्कूल या शाळेची इमारत धोकादायक ठरल्यामुळे गेल्या दीड दोन वर्षांपासून बंद होती. मात्र या शाळेच्या पुनर्बांधणीला अद्यापही सुरूवात झालेली नाही. पालिकेकडे सुशोभिकरणाच्या कामासाठी पैसा आणि वेळ आहे मात्र शाळेच्या पुनर्बांधणीसाठी पैसे नाहीत का असा प्रश्न रहिवासी उपस्थित करीत आहेत.

लालबागमध्ये बेस्ट वसाहतीजवळ असलेल्या पालिका शाळेत सकाळी लागलेल्या आग दुर्घटनेत जिवित हानी झालेली नसली तरी या दुर्घनटनेमुळे शाळेच्या पुनर्बांधणीचा विषय चर्चेत आला आहे. शाळेची इमारत धोकादायक स्थितीत असल्यामुळे ती बंद करण्यात आली होती. या शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत स्थलांतरित करण्यात आले होते. करोना काळात या शाळेत करोना केंद्र सुरू केल्यामुळे त्याचे सामान एका खोलीत होते. मराठी मध्यमवर्गीय वस्तीतील शाळा एक दीड वर्षापासून बंद ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक अनिल कोकीळ यांनी केला आहे. या शाळेच्या दुरुस्तीसाठी आधी पालिका प्रशासनाने नऊ कोटींचे काम दिले होते. दुरुस्तीही सुरू केली होती. मग नंतर अचानक शाळेची इमारत धोकादायक ठरवली असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता तरी या शाळेची पुनर्बांधणी तातडीने करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रशासन सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, रोषणाई यासाठी करोडो रुपये खर्च करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी वापरत आहे. परंतु देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बांधण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत हे या मुंबईचे दुर्दैव आहे, असा आरोप कोकीळ यांनी केला आहे.

शाळेची दुरुस्ती कधीही सुरु केली नव्हती, मात्र पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *