ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यातल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांचं निधन झालं. प्रभा अत्रे यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या.

प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून प्रभा अत्रे या रसिकांच्या स्मरणात राहतील. ‘ख्याल’ गायकीसह ‘ठुमरी’, ‘दादरा’, ‘गझल’, ‘उपशास्त्रीय संगीत’, ‘नाट्य संगीत’, ‘भजन’ व ‘भावसंगीत’ गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होतं. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात प्रभा अत्रे यांचा खूप मोठा वाटा आहे.आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करत असत. त्यांच्या काही रचना, मारू बिहाग रागातील ‘जागू मैं सारी रैना’, कलावती रागातील ‘तन मन धन’, किरवाणी रागातील ‘नंद नंदन’, यांचे सूर आजही रसिकांच्या कानात घुमत आहेत. आज या स्वरयोगिनीची स्वरसाधना शांत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *