ठाणे, रायगड, रत्नागिरीसह काही जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता

सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण असून थंडी काहीशी कमी झाली आहे. दरम्यान, मंगळवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सातारा जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच गेल्या २४ तासांत या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची नोंद झाली.

राज्यातील काही भागात मागील दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली असून दुपारी काहीसा उन्हाचा चटका जाणवत आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारीही हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, तसेच सिंधुदुर्ग भागातील आंबा, काजूवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, बागायतदार चिंतींत झाले आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यापासून गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या २४ तासांत रामेश्वर, देवगड येथे ५२.४ मिलिमीटर, सिंधुदुर्ग – कुडाळ १८ मिलिमीटर, सातारा – पाटण १.३ मिलिमीटर, तर खंडाळा येथे २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *