देशभरातील ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही पडू लागले आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये ट्रक चालकांच्या या संपामुळे सर्वसामान्यांना झळ बसत आहे. भाज्यांचा पुरवठ्याला बसलेल्या फटक्यामुळे भाज्यांच्या किंमती वाढल्यात, इंधनाचा पुरवठा कधीही खंडित होईल या भीतीने पेट्रोल पंपांबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी, संभाजी नगर, कल्याण, सातारा, लातूर, नागपूर, वसई-विरार नाशिकसारख्या शहरांमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर सर्वसामान्यांच्या काही किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्यात. अगदी स्कूल बस, रुग्णवाहिकांनाही या आंदोलनाचा फटका बसला आहे. एकीकडे या आंदोलनामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतानाच दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे. ट्रक चालक आंदोलकांच्या मागण्या योग्यच असून नवीन कायदा जाचक असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
राक्षसी कायदे
आव्हाड यांनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. “केंद्र सरकारने कायद्यामध्ये जे बदल केलेत त्यामध्ये अपघातात जर कोणी मरण पावले तर वाहनचालकाला 10 वर्ष कैद आणि 10 ते 15 लाख रुपये दंड, अशी शिफारस करण्यात आली आहे. मूळात अपघात कसा झाला, अपघाताला जबाबदार कोण, याची कुठलीही तपासणी करण्याची तरतूद यामध्ये ठेवलेली नाही. एकतर जेवढ्या ट्रकचालकांची गरज आहे त्यापेक्षा 40% कमी ट्रकचालक भारतात उपलब्ध आहेत. जर असे राक्षसी कायदे करण्यात आले तर कुणीही ट्रकचालक म्हणून काम करण्यास तयार होणार नाही. हाच कायदा पुढे कारचालकांनाही लागू होणार आहे,” असं आव्हाड यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं आहे.
