संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नवीन पक्ष्याची नोंद- ग्रे फ्रॅंकोलिनचे दर्शन

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अंगावर ठिपके, रेघा आणि पट्टे यांचे मिश्रण असलेल्या ‘राखी तित्तीर’ (ग्रे फ्रॅंकोलिन) या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. सध्या उद्यानात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून दीर्घकालीन पक्षी गणना सुरु आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पक्षीगणनेचे काम सुरु असून ते काम दीर्घकालीन आहे. प्रत्येक ऋतूमध्ये दिसणाऱ्या पक्ष्यांची नोंद केली जाते. याच सर्वेक्षणादरम्यान उद्यानातील पक्ष्यांच्या नोंदीत एका नवीन पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, सर्वेक्षण करताना दोन स्वयंसेवकांना उद्यानातील जांभूळमाळ येथे बिबट्याचेही दर्शन झाले. राखी तित्तीर हा मूळचा भारतातील पक्षी असून साधारण ६० सेमी आकाराच्या या पक्ष्याचे अंग तपकिरी रंगाचे असते. अंगावर ठिपके, रेघा आणि पट्टे यांचे मिश्रण असते. त्याची शेपूट आखूड असते तसेच शेपटीचा रंग तांबूस तपकिरी असतो. नर आणि मादी सारखे दिसतात. नराच्या दोन्ही पायांवर आऱ्या (छोट्या आकाराची नख असलेली बोटे) असतात. त्याचा त्यांना पळताना उपयोग होतो. या पक्ष्यांच्या झुंजीदेखील लावल्या जातात. पायांना असलेल्या नखांनी जमीन उकरून त्यात सापडलेले दाणे व कीटक ते खातात. त्याशिवाय धान्य, बिया, वाळव्या, शेणकिडे, ढालकीटक वेचून खातात. या पक्ष्याचा घरटे करण्याचा काळ निश्चित नसतो. स्थानिक परिस्थितीप्रमाणे, म्हणजे पावसाचे प्रमाण, पिके घेण्याच्या पद्धत आणि खाद्याच्या उपलब्धतेप्रमाणे त्यांची वीण होते. पन्नास स्वयंसेवकांच्या मदतीने पक्ष्यांची नोंद केली जाते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतील डॉ. राजू कसंबे आणि डॉ. आसिफ खान तसेच मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले यांच्या सहकार्याने पक्षी गणना करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *