“आईला असलेलं कुणबी आरक्षण तिच्या लेकरालाही द्या”, मनोज जरांगेंची नवी मागणी; म्हणाले, “विदर्भातील मुली…”

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापत जात आहे. छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असं अघोषित शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. यामुळे ओबीसी आणि मराठा समाजात वैर निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच, मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे. आतापर्यंत लाखो नोंदी सापडल्या आहेत. तसंच, यापुढे जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी आता नवी मागणी केली आहे. आईला असलेलं आरक्षण तिच्या मुलालाही लागू करा, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही मागणी केली.

मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी खूप पुरावे आहेत. देवस्थानांची पुरावे आहेत. समितीने कोट्यवधी दस्तावेज शोधले, त्यात काय लिहिलं होतं? काहीमध्ये शेती लिहिलंय, म्हणजेच तो कुणबी झाला.

मराठवाड्याचा विदर्भाशी आणि पश्चिम महाराष्ट्राशी नातं आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील मुली मराठवड्यात केल्या जातात. ती जेव्हा रोटी-बेटी व्यवहार करून येथे येते तेव्हा तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. आईचं आरक्षण लेकराला मिळालं पाहिजे, कारण ती तिची लेकरं आहेत, असं जरांगे म्हणाले.

“कुणबी आणि मराठे एक आहेत. आईकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्याचा लाभ तिच्या लेकराला घेता येणार नसेल तर कोणत्या कायद्याची चौकट लागू करता तुम्ही? आईचं आरक्षण लेकरालाही लागू झालं पाहिजे. असं केलं तर मराठवाडा आणि महाराष्ट्र फिट होऊन जाईल. यासाठी एक शासन निर्णायाची गरज आहे”, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *