रोजच्या आमटी-भाजीला स्वादाची फोडणी देणारा लसूण महागला असून एक किलोचा दर तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत गेला आहे. संकरित लसणाचे मोठे उत्पादन घेणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये पाऊस झाल्याने पिके वाया गेल्यामुळे आवक घटली आहे. दुसरीकडे देशी वाणही बाजारातून गायब झाल्याने लसणाच्या दरावर परिणाम झाला आहे.
लसणाला आहारात महत्त्व आहे. मात्र, देशी वाण असलेला औषधी लसूण दुर्मीळ झाला आहे. याला पर्याय म्हणून राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील इंदूर येथून संकरित लसणाची आवक बाजारात होते. मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे लसणाचे नुकसान झाले आहे. दिवाळीपूर्वी तीस ते चाळीस रुपये किलो असलेला लसूण आता अडीचशेच्या घरात पोहचला आहे. देशी लसूण विक्रीसाठी येण्यास दोन महिन्यांचा अवधी असल्याने या महागाईत आणखी भर पडली आहे. संकरित लसणासाठी किलोला अडीचशे ते तीनशे रुपये तर देशी लसणासाठी चारशे रुपये मोजावे लागत आहेत. फेब्रुवारी अखेपर्यंत लसणाचे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापारी इब्राहिम अल्लामिन बागवान यांनी व्यक्त केली.
देशी लसूण दुर्मीळ
देशी लसणाचे उत्पादन प्रामुख्याने स्थानिक व कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, हुबळी परिसरात होते. याची लागवड कुडी लावून केली जाते व मशागतीसाठी मानवी श्रमांची गरज असते. शिवाय हा लसूण वर्षभरच टिकतो. त्यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबाची गरज भागविण्यापुरतीच त्याची लागवड करतात.