देशद्रोहाचा गुन्हा दाखल होताच संजय राऊत आक्रमक; मोदी-शाहांना प्रत्युत्तर देत म्हणाले, “आमच्या जीभा कापून…”

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. १० डिसेंबर रोजी राऊतांनी दै. सामना वृत्तपत्रातून रोखठोक सदरात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यावरून यवतमाळ जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुतडा यांनी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल होताच संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांना आणीबाणीचा काळ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरून लक्ष्य केलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आमच्या मनात आदराची भावना आहे. त्यांच्यावरील टीका ही राजकीय स्वरुपाची असते, व्यक्तिगत स्वरुपाची नसते”, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

पुढे ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी अमित शाहांनी ३७० कलमासंदर्भात पंडित नेहरुंवर टीका केली होती. म्हणून कोणी अमित शाहांवर गुन्हा दाखल करणार आहे का? या देशात लोकशाही आहे, या देशात संविधान आहे. या देशात अद्याप हुकूमशाही किंवा आणीबाणी लावलेली नाही. किंवा आमच्या जीभा कापून टाकलेल्या नाहीत, असाही पलटवार त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *