मध्यरेल्वेच्या दिरंगाई कारभारामुळे प्रवासी हैराण

मध्य रेल्वे स्थानकांमधील अंबरनाथ आणि बदलापूर येथून सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या दरम्यान धीम्या आणि जलद गतीने धावणाऱ्या उपनगरीय गाड्या कायम गर्दीने भरलेल्या असतात. या कालावधीत गाड्या अगदी काही मिनिटे जरी विलंबाने धावल्या तरी प्रवाशांना अधिकच्या गर्दीतून प्रवास करण्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. मागील काही दिवसांपासून या मार्गावरून धावणाऱ्या गाड्या सातत्याने दहा ते पाच मिनिटे उशिराने धावत आहेत. तर गुरूवारी सकाळी नऊ नंतर सुटणाऱ्या गाड्या तब्बल २० मिनिटाहून अधिक उशिराने धावल्याने प्रवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागला. यामुळे प्रवाशांनी समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मध्य रेल्वेवरील ठाणे पल्ल्याड स्थानकांमध्ये डोंबिवली, कल्याण या स्थानकानंतर अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांमध्ये सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी असते. या दोन्ही स्थानकांमधून आपल्या दैनंदिन कामासाठी ठाणे, मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या काही लाखाच्या घरात आहे. या शहरांना लागून असलेला ग्रामीण भाग देखील येथील उपनगरीय लोकल सेवेवरून अवलंबून आहे. यामुळे दुपारचा काही कालावधी वगळला तर सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी ५ ते ९ या दरम्यान स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून येते. यामुळे येथून सुटणाऱ्या गाड्यांमध्येही मोठी कसरत करत प्रवाशांना लोकलमध्ये चढावे लागते. तर या कालावधीत गाड्या उशिराने धावल्यास अधिक गर्दीचा सामना करावा लागतो. याचे प्रमाण सकाळी अधिक असते. असे असतानाही मागील काही दिवसांपासून या मार्गावरून धावणाऱ्या उपनगरीय लोकल गाड्या प्रामुख्याने सकाळच्या वेळेत सातत्याने उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे. तर गुरूवारी सकाळी प्रामुख्याने नऊ नंतर धावणाऱ्या गाड्या तब्बल पंधरा मिनिटाहून अधिक उशिराने धावत होत्या. यामुळे सकाळी आपल्या कामासाठी कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना उशिराने पोहचावे लागल्याने नाहक मनःस्ताप सहन करावा लागला. तसेच गाड्या उशिराने धावत असल्याने गर्दीतून प्रवास करावा लागला. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा रोष दिसून आला. तर बहुतांश प्रवाशांनी समाजमाध्यमांद्वारे मध्ये रेल्वेला जाब विचारत आपला रोष व्यक्त केला. तर याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाला संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *