इस्रोची (ISRO) अतिशय मोठी आणि महत्त्वाकांक्षी अशी चांद्रयान 3 मोहिम यशस्वी ठरल्यामुळं जागतिक अवकाश क्षेत्रामध्ये भारताचं नाव उंचावलं. चांद्रयानासोबत चंद्राच्या पृष्ठावर उतरलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरच्या माध्यमातून चंद्रावरील जमीन, तेथील एकंदर स्थिती आणि अनेक गोष्टींचा उलगडा झाला आणि पाहता पाहता चंद्रावरील दृश्य इथं पृथ्वीवर बसून सर्वांनाच अगदी सहजपणे पाहता आली. आता याच चांद्रयान मोहिमेसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट बऱ्याच काळानंतर इस्रोनं दिली आणि अनेकांच्याच नजरा वळल्या.
अधिकृत X अकाऊंटवरून माहिती देत इस्रोनं चांद्रयानाचं प्रोपल्शन मॉड्यूल आता परतीच्या प्रवासाला लागल्याचं या पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलं. एका अतिशय वेगळ्या प्रयोगामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल ल्युनार ऑर्बिटमधून म्हणजेच चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणलं गेलं आहे असं इस्रोनं सांगत या प्रयोगाची छायाचित्र प्रसिद्ध केली.
