‘भारतात मुलींच्या “नाईट आऊट’ला मान्यता नाही’

‘भारतात मुलींच्या “नाईट आऊट’ला मान्यता नाही’

मुलींनी रात्री फार वेळ घराबाहेर राहणे ही आपली संस्कृती नाही. भारतात मुलींच्या अशा “नाईट आउट‘ला मान्यता नाही‘ असे म्हणत केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या वक्तव्यावर देशभरातून टीका होत असल्याने सारवासारव “मी तसे म्हटलोच नाही‘ असे म्हणत शर्मा यांनी घुमजाव केले आहे.

नवरात्रीदरम्यान मांसाहार करू नये‘, “मुसलमान असूनही कलाम देशभक्त‘ अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे शर्मा अलिकडे चर्चेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तीव्र टीकाही होत आहे. त्यातच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना, “रात्रीच्या वेळेस मुलींनी देशाबाहेर राहणे ठीक आहे. परंतु आपल्या संस्कृतीमध्ये ही स्वीकारार्ह नाही‘ असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र टीका होत असतानाच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, “मी तसे वक्तव्य केले नसून माध्यमांनी माझे अर्धेच वक्तव्य दाखविले आहे‘ तसेच “मी भारतीय संस्कृतीचा आदर करतो. पण त्यामुळे मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करत नाही. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे‘ असा खुलासाही त्यांनी केला.

यावेळी शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदर्भ देत गुजरातमध्ये रात्री उशिरा महिलांनी फिरणे सुरक्षित असल्याचे मोदी म्हणत असल्याचेही सांगितले. तसेच “माझी मुलगी डॉक्‍टर असून बहुतेकदा ती रात्री उशिराच घरी येते‘ असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *