समुद्रातलं सोनं! गुजरातने राज्य माशाचा दर्जा दिलेल्या माशाच्या किमतीत तुमची युरोप टूर होईल

 मच्छीमारांची लॉटरी समजल्या जाणाऱ्या ‘घोळ’ माशाला गुजरात सरकारने नुकताच राज्य माशाचा दर्जा दिला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या ‘ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023’मध्ये घोळ माशाला गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलं. जगातील इतर देशांमध्ये‘ब्लॅक स्पॉटेड क्रोकर फिश’ म्हणून ओळखला जाणारा घोळ हा भारतातील सर्वात मोठा मासा आहे. आता मोठ्या माशाची किंमत देखीत तितकीच मोठी आहे.

घोळ मासा हा भारतातील सर्वात महागड्या माशांपैकी एक आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार या माशाची किंमत 5 लाख रुपयांपर्यंत आहे. किमतीव्यतिरिक्त काही विशेष गुणांमुळे घोळ माशाला गुजरातचा राज्य मासा घोषित करण्यात आला आहे. या माशाचा उपयोग औषध आणि दारू बनवण्यासाठी केला जातो. चीनमध्ये या माशांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत घोळला राज्य माशाचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासूनच या माशाच्या किमतीची आणि वैशिष्टांची भरपूर चर्चा सुरु झाली.

 घोळ माशाला त्याच्या बाजारातील किमतीमुळे ‘सी गोल्ड’ असेही म्हणतात. हा सागरी मासा हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागरात आढळतात. पण प्रदूषण आणि सातत्याने सुरु असलेल्या मासेमारीने हा मासा खोल समुद्रात जाऊन राहतो. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी खोल समुद्रात जावं लागतं. या माशाला पकडण्यसाठी मच्छिमारांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो. घोळ मासा हा त्याच्या पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांसाठी महत्त्वाचा आहे. फार्मास्युटिकल आणि कॉस्मेटिक उद्योगातही याची खूप मागणी आहे. तसेच वाइन आणि बिअरच्या उत्पादनात देखील त्याचा वापर केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *