घरमालकाने दुचाकीच्या रेसचा मोठा आवाज केल्याचा त्रास झाल्याने भाडेकरूने त्याला बेदम मारहाण केली; तसेच पाण्याच्या टाकीत बुडवून त्याचा खून केला. ही घटना सोमवारी दुपारी १२ ते दीडच्या सुमारास उरळी देवाची येथील खंडोबाचा मळा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी भाडेकरूला अटक केली असून, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दादा ज्ञानदेव घुले (वय ५० रा. खंडोबाचा मळा, उरळी देवाची) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी संतोष राजेंद्र धोत्रे (वय ३७, रा. खंडोबा माळ, ता. हवेली, मूळ रा. सोलापूर) याला अटक करण्यात आली. या प्रकरणी प्रथमेश संतोष घुले (वय १९, रा. घुले वस्ती, मांजरी) यांनी फिर्याद दिली.
संध्याकाळपर्यंत दादा घुले दिसले नसल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्या वेळी पाण्याच्या टाकीत त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे समोर आले. या प्रकरणी संतोष धोत्रे याला पोलिसांनी अटक करून, मंगळवारी रात्री लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक एस. खैरनार पुढील तपास करीत आहेत.
