48 तास अन् 41 मृत्यू: जबाबदार कोण? सरकारचा दावा फोल, धक्कादायक वास्तव उघड

नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या  रूग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू (31 Deaths) झालाय. सोमवारी 24 तासांत 24 मृत्यू झाल्यावर काल पुन्हा 7 जणांचा बळी गेला. मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात  गेल्या 24 तासांत 2 शिशूंसह 10 रुग्ण दगावले आहेत. नांदेड आणि घाटी रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवानंतरही आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवरच आहे.

धक्कादायक वास्तव उघड
रुग्णांच्या नातेवाईकांना सर्व औषधं (Medicines) बाहेरून आणावी लागत असल्याचं धक्कादायक वास्तव उजेडात आलंय. सरकार, हॉस्पिटल प्रशासन हॉस्पिटलमध्ये औषधं उपलब्ध असून, कसलीही कमतरता नसल्याचा दावा करतंय. हे सगळे रुग्ण गंभीर असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगतंय.. या घटनेनंतर तातडीने प्रशासनाने प्रेसनोट काढून औषधं असल्याचा दावा केला. 4 मृत्यू हे वैद्यकीय सेवेअभावी नाहीत तर अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आकडा वाढल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. सलाईन, सिरींज, रेबीज, सर्पदंश अश्या सर्वच औषधी बाहेरून आणाव्या लागत आहेत.

माऊलीच्या डोळ्यात तरळले अश्रू
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात कसा ढिसाळ कारभार सुरू आहे याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथली एक आई आपल्या 14 वर्षाच्या मुलाला डेंग्यू झाल्याने नांदेडच्या रुग्णालयात घेऊन आली. कसेबसे तिकिटापुरते पैसे घेऊन ही आई आपल्या मुलासोबत नांदेडला आलीय. रुग्णालयात मुलावर उपचार सुरू झाले आहेत. मात्र सातशे रुपये किंमतीच्या औषधं बाहेरून आणण्यास डॉक्टरांनी सांगितलं. कसेतरी पैसे जुळवून ह्या मातेने आपल्या मुलासाठी बाहेरून औषधी आणली. पण अजूनही औषधी बाहेरून आणावी लागतील असं सांगण्यात आले. मी पैसे कुठून आणू हे सांगताना या महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *