पुण्यात वेटरची आत्महत्या

पुण्यातील कुबेरा गार्डन हॉटेलमधील एका वेटरने आपल्या आठ सहकाऱयांवर चाकूने हल्ला करून नंतर आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. आठही जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. बिदन ऊर्फ पूनम घोष असे हल्ला केलेल्या वेटरचे नाव आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिदन याने गुरुवारी रात्री हॉटेल बंद झाल्यावर तेथील एका खोलीमध्ये प्रवेश केला. याच खोलीत तो आणि त्याचे इतर सहकारी राहतात. खोलीत आल्यावर त्याने स्वतःकडील चाकूने सहकाऱयांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्याने सहकारी वेटर घाबरले आणि त्यांनी त्या खोलीतून पळ काढला. यानंतर बिदनने हॉटेलमधील बार असलेल्या ठिकाणी जाऊन स्वतःवर त्याच चाकूने हल्ला करीत आत्महत्या केली. बिदन मनोरुग्ण असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.
या घटनेबद्दल माहिती मिळाल्यावर फरासखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या वेटरवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *