परळ वर्कशॉप येथून निघालेल्या गणेश मूर्ती आगमन मिरवणूकीदरम्यान गणेशभक्तांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार केला जात असल्याचा आरोप गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. आगमन मिरवणुकीबाबत पोलीस स्थानकात माहिती देऊनही अशी कारवाई केली जाते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गणेशोत्सव समन्वय समितीने नाराजी व्यक्त केली असून पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सवाला मोजके दिवस शिल्लक असून लालबाग परळ या भागात दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. परिसरात मोठ्या गणेशमूर्तींचे अनेक कारखाने आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती तेथे तयार होतात. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी महिनाभर आधीपासून मूर्ती मंडळात आणून ठेवल्या जातात व त्यानंतर सजावट केली जाते. यंदाही गणेश मूर्ती आधीच आणण्यास सुरुवात झालेली आहे. रविवारचा मुहूर्त साधून अनेक मंडळांच्या गणेशमूर्ती आगमन मिरवणुका निघाल्या. मात्र या मिरवणुकीच्यावेळी गणेश भक्तांवर सौम्य लाठीहल्ला पोलीस करीत असल्याची तक्रार मंडळांनी समन्वय समितीकडे केली आहे. त्यामुळे समन्वय समितीचे प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
