विद्यादान करून जाताना रस्त्यातच मृत्यूने गाठलं!

अंबरनाथ येथील पालेगावाजवळून जाणाऱ्या कर्जत काटई महामार्गावर एका भरधाव ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या शिक्षिकेला चिरडल्याची घटना समोर आली आहे. तरविन बिंद्रा (३८) असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाला अटक केली आहे.

अंबरनाथ येथील पालेगाव परिसरातील कर्जत काटई मार्गावरून शुक्रवारी दुपारच्या सुमारास तरविन डोंबिवलीहून अंबरनाथच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून जात होत्या. त्या पालेगाव चौकात आल्या असताना यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती स्थानिकांनी अंबरनाथ शिवाजी नगर पोलिसांना दिली.

दरम्यान, पोलिसांनी ट्रक आणि त्याचा चालक तानाजी आटपाडकर याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *