पुणे बंगळुरु हायवेवर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, गाडीचा चेंदामेंदा

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बॉम्बे रेस्टॉरंटनजीक आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवी मुंबईहून जयसिंगपूरकडे निघालेल्या तवेरा गाडीचा टायर अचानक फुटला. त्यामुळे गाडी समोरुन कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या बोलेरो पिकअपला धडकली. यात तवेरा गाडीतील तिघा प्रवाशांना प्राण गमवावे लागले.

मृतांमध्ये निखिल श्रीकांत सवाखंडे (वय ३० वर्ष), प्रियांका निखिल सवाखंडे (वय ३२ वर्ष), शशिकांत यदुनाथ सवाखंडे (वय ६३ वर्ष) यांचा समावेश आहे. इतर जखमींवर जिल्हा शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.

पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नवी मुंबई येथून जयसिंगपूरकडे निघालेल्या तवेरा गाडीचा टायर साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात असणाऱ्या कणसे हुंडाई शोरूमजवळ अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून समोर कोल्हापूरकडे निघालेल्या बोलेरो पिकअप टेम्पोला तवेराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की या गाडीत प्रवास करणाऱ्या तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये तवेरा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्या हटवल्या आहेत. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *