गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने राज्य सरकारने अवघ्या शंभर रुपयांत दिलेला ‘आनंदाचा शिधा’ आता गणेशोत्सवासह दिवाळीत मिळणार आहे. त्याचा लाभ शहरातील तीन लाख ३३ हजार, तर जिल्ह्यातील पाच लाख ७४ हजार अशा नऊ लाख सात हजार शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. मात्र, शिधा वितरण कधीपासून होणार, हे अद्याप निश्चित झाले नाही.
‘शहरात तीन लाख २९ हजार ९०७ प्राधान्य कुटुंब लाभार्थी आहेत. अंत्योदय योजनेतील सात हजार ३७० लाभार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी तीन लाख ३७ हजार २७७ किटची शहरात मागणी करण्यात आली आहे. पाडव्याला शहरात तीन लाख १७ हजार ८८१ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. त्यात आता वाढ झाली आहे. त्यानुसार सरकारकडे किटची मागणी केली आहे,’ असे शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी मागवले किट
जिल्ह्याच्या अन्नधान्य पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर म्हणाल्या, ‘जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबातील पाच लाख ४० हजार ७४४; तसेच ४८ हजार ५७० एवढे अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत. त्यानुसार पाच लाख ८९ हजार ३१४ एवढे लाभार्थी आहेत; परंतु गणेशोत्सवासाठी पाच लाख ७४ हजार ५९ एवढ्या किटची मागणी सरकारकडे केली आहे. पाडव्याला वाटप झालेल्या शिधा किटच्या संख्येनुसार ही मागणी राज्य सरकारकडे नोंदवली आहे.’
आनंदाचा शिधा वाटप ‘ई-पॉस’द्वारे दिला जाईल. ‘ई-पॉस’ची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाईल. जिल्ह्यात गेल्या वेळी एकूण पाच लाख ६० हजार ६१९ जणांना याचा लाभ मिळाला होता.- डॉ. सीमा होळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
