बागेश्री’चा गुहागर-श्रीलंका प्रवास सुरूच; ‘गुहा’ कासवीणीच्या सॅटलाईट ट्रान्समीटरचा प्रतिसाद बंद

ऑलिव्ह रिडले कासवांपैकी रत्नागिरीतील गुहागरमध्ये टॅग केलेली ‘बागेश्री’ ही मादी कासवीण श्रीलंकेपर्यंत पोहोचली असून तीची श्रीलंकेच्या समुद्रात भ्रमंती सुरू आहे. आतापर्यंत ‘बागेश्री’ने गुहागर येथून सरळ रेषेत १,२०० किमी प्रवास केला आहे. मात्र ‘गुहा’ या कासवीणीला बसविलेल्या ट्रान्समीटरमधून संकेत मिळत होते. मात्र आता या कासवीणीचा संपर्क तुटला आहे.

भारतीय वन्यजीव संस्था, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभागाच्या रत्नागिरी विभागातील पथकाने रत्नागिरीतील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांना फेब्रुवारीमध्ये सॅटलाईट ट्रान्समीटर बसवले आणि त्यानंतर त्यांना समुद्रात सोडण्यात आले होते. या दोन मादी कासवांचे ‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ असे नामकरण करण्यात आले होते. दरम्यान, ‘बागेश्री’ने गोवा, कर्नाटक, केरळ, नागरकॉइल, पुढे श्रीलंकेतील कोलंबो आणि गेल या शहरांपर्यंत प्रवास केला. सध्या ‘बागेश्री’ श्रीलंकेच्या समुद्रात भ्रमंती करताना दिसत आहे. तिने श्रीलंकेजवळ भ्रमंतीची दोन वर्तुळे पूर्ण केली असून तिसरे वर्तुळ पूर्ण करण्याच्या तयारीत ती आहे. दरम्यान, लक्षद्वीपजवळ असलेल्या ‘गुहा’ कासवीणीच्या सॅटलाईट ट्रान्समीटरने प्रतिसाद देणे थांबवले आहे. गुहा कासवीणीने टॅग केल्यानंतर १५५ दिवस ट्रान्समीटरद्वारे संकेत दिले. मात्र, आता तिच्याशी असलेला संपर्क तुटलेला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांची तुरळक घरटी आहेत. आतापर्यंत ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांना फक्त भारताच्या पूर्व किनारपट्टीवर टॅग करण्यात आले आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासवांचा हा पहिला सॅटलाईट टॅगिंग प्रकल्प आहे. हा प्रकल्प भारतीय वन्यजीव संस्था, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभागातर्फे राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ऑलिव्ह रिडले कासवांची हालचाल, त्यांच्या स्थलांतराची स्थिती समजून घेण्यास मदत होत आहे. दरम्यान, बागेश्रीच्या पुढील भ्रमंतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *