मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न गंभीर बनला असून सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास काम सुरू असताना झालेल्या अपघातात १७ कामगार ठार झाले. समृद्धी महामार्गावर काम सुरू असताना आतापर्यंत चार अपघात झाले असून सोमवारचा पाचवा अपघात तुलनेत मोठा होता. मात्र यापूर्वीच्या चार अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) गर्डर बसविण्याचे काम करणाऱ्या चेन्नईतील व्हीएसएल कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
समृद्धी महामार्गाचे काम चार टप्प्यात आणि १६ पॅकेजमध्ये करण्यात येत आहे. चारपैकी नागपूर – शिर्डी आणि शिर्डी – भरवीर असे दोन टप्पे वाहतूक सेवेत दाखल आहेत. तर भरवीर – इगतपुरी आणि इगतपुरी – आमणे टप्प्यांचे काम सध्या वेगात सुरू आहे. तिसरा टप्पा दिवाळीदरम्यान पूर्ण होणार असून चौथा शेवटचा टप्पा डिसेंबरअखेरीस पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन होते. मात्र हा टप्पा तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामाच्या दृष्टीने सर्वाधिक कठीण, आव्हानात्मक मानला जात आहे. या टप्प्यात तब्बल १२ बोगदे असून यातील एक बोगदा आठ किमी लांबीचा आहे. तर उर्वरित ११ बोगदे सरासरी एक किमी लाबीचे आहेत. कसारा घाटातून हे बोगदे जाणार असून या बोगद्यामुळे कसाराघाट अगदी पाच-सहा मिनिटात पार करता येणार आहे. त्याचवेळी या टप्प्यात १६ व्हायाडक्टचा (उंच पूल, दरीवरून रेल्वे मार्गावरून जाणारा रस्ता) समावेश आहे. मोठमोठी दरी पार करून महामार्ग जाणार आहे. नाशिकमधील वशाळा येथील एका दरीवरून महामार्ग जाणार असून येथील पूलाचे खांब तब्बल ८४ मीटर अर्थात २७५ फूट इतके उंच आहेत. त्यामुळे हे आव्हानात्मक काम पूर्ण होण्यास डिसेंबरऐवजी आता मे २०२४ उजाडेल असे नुकतेच एमएसआरडीसीने जाहीर केले आहे. याच टप्प्यात कामादरम्यान आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात झाला आहे.
