मुंबई: रेल्वेगाडय़ांची अग्निसुरक्षा वाढवण्याचे काम वेगात

लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाडय़ांमध्ये आग लागण्याच्या घटना घडत असून त्यावर उपाय म्हणून रेल्वे गाडय़ांमध्ये अग्निसुरक्षा वाढवण्यात येत आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लांब पल्ल्यांच्या विनावातानुकूलित डब्यांमध्ये आगशोधक आणि आगशमन यंत्रणा स्थापन केली आहे. तसेच पॅन्ट्री कार, पॉवर कार्समध्ये, वातानुकूलित डब्यात अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्याचे काम वेगात सुरू आहे.

नुकताच तेलंगणामधील यादाद्री जिल्ह्यातून फलकनुमा एक्स्प्रेस जात असताना एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग लागली. बोम्मयल्ली गावाजवळ गाडी तात्काळ थांबवण्यात येऊन आग विझवण्यात आली. अशा घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने त्यांच्या सर्व रेल्वेगाडय़ांच्या डब्यात आग शोधणे आणि शमन यंत्रणा बसवण्याच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेतला. मध्य रेल्वेने आतापर्यंत लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमधील सर्व विनावातानुकूलित डब्यांमध्ये ही यंत्रणा बसवली आहे. तसेच ५० पॅन्ट्री कारमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली असून २ पॅन्ट्री कारमध्ये यंत्रणा स्थापन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच १३७ पॉवर कार्सपैकी फक्त ६ कार्समध्ये ही यंत्रणा स्थापन करणे बाकी आहे. यासह यंदाच्या आर्थिक वर्षांत लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या २४ वातानुकूलित डब्यात आग शोधणे आणि शमन यंत्रणा बसवण्यात आली असून आणखीन डब्यात हे काम सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी, प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी आणि आगीच्या घटनांचा धोका कमी करण्यासाठी अग्निसुरक्षा वाढवण्यात येत आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ात आगशोधक आणि शमन यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *