पावसाळी वातावरणात स्त्रियांची पावलं निसर्गाकडे वळण्यासाठी भाद्रपद महिना अनेक व्रत-वैकल्यं घेऊन आलेला आहे. दिवसभराचे लंघन व फुलं-पत्री गोळा करण्यासाठी थोडंसं निसर्गभ्रमण, असा स्त्रियांसाठी आरोग्याचा मंत्र विविध व्रतांतून सांगितलेला दिसतो. रानभाज्या व पत्रींची महती पटवून देणारी हरितालिका, श्रीगणोश चतुर्थी, ऋषिपंचमी, ज्येष्ठागौरीपूजन हे सारं आता एकेक करून साजरं होणार! या काळात रांगोळी काढणारी, फुलं वेचून माळा गुंफणारी, कापसाच्या वाती वळणारी, आरास करून मखर सजवणारी, नैवेद्याचे जिन्नस आवडीनं बनवणारी कुणीही उत्साहानं भारली जाते. साहजिकच तिच्यातला राग, चिडचिड कमी होते. सणानिमित्त सजता-सवरताना तिला हार्मोन्सच्या बदलाचा त्रसही जाणवत नाही. रोजच्या ताण-तणावातून तिची सुटका करणारी ही व्रतं म्हणूनच तर महत्त्वाची आणि हवीहवीशी वाटतात.
हरितालिका
शंकराच्या प्राप्तीसाठी पार्वतीनं खडतर व्रत केलं, तेच हरितालिका व्रत होय. पार्वतीनं हे व्रत करताना आहाराचा हळूहळू त्याग केला. काही दिवस फलाहार करून नंतर पानांचा पर्णआहार फराळी पदार्थ म्हणून केला.
व्रताच्या शेवटच्या टप्प्यात पार्वतीने पर्णआहार करणंही सोडून दिले म्हणून तिला ‘अपर्णा’ या नावानेही संबोधले गेले, अशी व्रतांतर्गत कथा सांगितली जाते. आधुनिक काळातल्या स्त्रिया आणि मुली यांच्यासाठी पार्वतीचं हे व्रतातलं आचरण म्हणजे आदर्श ठरावा. हल्लीच्या मुली व स्त्रिया विविध कारणांसाठी, वजन कमी करण्यासाठी अचानक अन्न खाणंच सोडून देतात. त्यातून आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. शरीरातील जठराग्नीला योग्य वेळी व योग्य प्रमाणात भोजन दिलं नाही तर तो स्वत:च्या शरीरातील धातूंचे पचन घडवतो. त्यामुळे पुढे जाऊन किडनी, लिव्हर इत्यादि मृदू अवयवांच्या कार्यकारी शक्तीवर दुष्परिणाम संभवतात. केस गळणं, दृष्टी कमी होणं, हाडं कमकुवत होणं इत्यादि लक्षणं अचानक व चुकीच्या पद्धतीनं केलेल्या डायटिंगमुळे होतात. उपवास म्हणजे शरीरशोषण नव्हे; ते कसं केलं पाहिजे याचंच उदाहण म्हणजे हरितालिका व्रत होय! तपामुळे गौरीचं मुखकमल तेज:पुंज झालेलं होतं. मात्र डायटिंगमुळे चेह:याची रयाच निघून जाते. उपवासाच्या निमित्ताने घडणारा धान्यबदल व आहारीय पदार्थाचा बदल आरोग्यकारक कसा ठरेल याचे भान प्रत्येकानं ठेवायला हवं. हरितालिकेला शहाळ्याचं दान करतात. अर्थात ज्यांना उपवास सहन होत नाही त्यांनी शहाळी प्यायची असतात. नारळाच्या पाण्याला ‘नैसर्गिक सलाईन वॉटर’ म्हणतात. कारण त्यात खनिजांचा साठा आहे, जी खनिजं शरीरास अत्यंत आवश्यक असतात. त्यातील आद्र्रता 9क्.8 एवढय़ा अधिक प्रमाणात असते. त्यामुळे शहाळ्याच्या पाण्यानं तहानेचं शमन लगेच होते व शरीराला ताबडतोब बल प्राप्त होते.
ज्येष्ठागौरी व्रत
घरातील लेकी-सुनांचं कौतुक कसं करावं याचं प्रात्यक्षिक आई व सासूकडून घडावं अशी या ज्येष्ठागौरी व्रताची रचना केली आहे. तसेच लेकी व सुनांना माहेर हे चार दिवस कौतुकाचे, मात्र सासरच कायमस्वरूपातील हक्काचं असतं, याची शिकवण ज्येष्ठागौरी व्रतातून सहज मिळते. हा सराव व्रतादरम्यान आपसुकच घडत असावा. गौरींचं पूजन पावसाळी वातावरणातील उदासीनता दूर करून स्त्रियांच्या मनात उत्साह जागृत करणारं आरोग्यदायक व्रत आहे.
ऋषिपंचमी
रानभाज्यांची औषधी मेजवानी
भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीला एक खास महत्त्व आहे. कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वसिष्ठ हे सप्तर्षी. त्यांचं वंशनिर्मितीत व भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्वाचं स्थान मानलं जातं. त्यांचं हे पूजन. ऋषिपंचमीला विशिष्ट पद्धतीनं आहार सेवनाविषयी काही नियम आहेत. या दिवशी नांगरट न झालेल्या शेतातून सहज उगवून येणा:या रानभाज्यांचे व धान्याचे न बोलता सेवन करायचं असतं. स्त्रियांनी करायच्या या व्रतात ‘ऋषीची भाजी’ बनवली जाते. भाद्रपदात विपूल प्रमाणात उपलब्ध असणा:या हिरव्यागार व ताज्या कसदार रानभाज्यांचं सेवन व्रतानिमित्त आबालवृद्धांना घडतं हे या व्रताचं विशेषत्व आहे ! ऋषीची भाजी अर्थात एकत्रितपणो शिजवलेली रानभाज्यांची भरपूर जीवनसत्त्वं व खनिजं असणारी अतिशय औषधी मेजवानी होय. ‘पान’ म्हणजे झाडाचे स्वयंपाकघर होय. वनस्पतीला आवश्यक असणा:या सर्व खनिजांचे व जीवनसत्त्वांचे निर्मितीस्थान म्हणजेच ‘पान’ होय. भाद्रपदातील ताज्या पालेभाज्या आपल्याला आरोग्यकारक भेटी देतात.
तांदुळजा
डोळ्यांसाठी पथ्यकर
तांदुळजा पावसाळ्यात सर्वत्र सहजपणो उगवणारी पालेभाजी आहे. ही भाजी साधारणत: चवळीच्या पानांप्रमाणोच दिसते. तांदुळजाची भाजी चवीला अतिशय रुचकर लागते. ही भाजी गुणांनी थंड आहे. विशेषत: रक्त व पित्तविकारांवर उपयोगी आहे. हिच्या सेवनानं लघवी साफ होते व मलावरोध दूर होतो. डोळ्यांच्या आरोग्यास ही भाजी फार पथ्यकर आहे.
लाल माठ व सफेद माठ
शरीराच्या दाहावरचा उपाय
पावसाळ्यात लाल व हिरव्या पानांची ही भाजी सहज प्राप्त होते. माठाच्या दोन्ही प्रकारांचे गुणधर्म सारखेच आहेत. मात्र लाल माठ अधिक औषधी आहे. देवाच्या प्रसादाच्या भाजीत व ऋषीच्या भाजीत म्हणून लाल माठाचे देठ विशेषत्वानं वापरतात. माठाची भाजी थंड असून, शरीराचा दाह कमी करते. मूळव्याधीचा त्रस कमी व्हावा म्हणून हिचे नियमित सेवन करावं. लाल माठातून लोह मिळतं. लाल माठाच्या पानांपेक्षा देठात औषधी गुणधर्म अधिक आहेत. देठातून फॉलिक अॅसिड व कॅरोटिन मिळतं.
टाकळा
त्वचाविकारावर औषध
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला व उघडय़ा माळरानावर सर्वत्र गोलाकार पानांची व पिवळसर फुलांची ही भाजी सहज उपलब्ध होते. हिच्या पानांमधून उग्र वास येतो. टाकळा हे अ जीवनसत्त्वाचा उत्तम पुरवठादार आहे. टाकळ्याच्या पानांतून कॅरोटिन मिळतं. टाकळ्याची भाजी कडू लागते परंतु पचायला हलकी असते. कृमी, खाज व त्वचाविकारावर उपयोगी असते. टाकळ्याच्या पानांचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. फुलं आल्यानंतर टाकळ्याचा भाजी बनवण्यासाठी वापर करत नाहीत.
चवळी
थंड आणि रुचकर
चवळीचे गुणधर्म तांदुळजाप्रमाणोच आहेत. फक्त क्षारांचं प्रमाण चवळीत तुलनेनं कमी असतं.
अळू
स्वस्तातलं मस्त औषध
अळूशिवाय ऋषीची भाजी बनू शकत नाही. अळूच्या शंभरहून अधिक जाती भारतभरातून सापडतात. अळू पचनास जड असून, अतिशय बल देणारा आहे. अळूच्या पानांत अ जीवनसत्त्वाचा विपूल साठा आहे. अर्थात अळूच्या पानात कॅरोटिन असतं. अळूच्या पानांमधून कॅल्शियम, फॉस्फरस व क जीवनसत्त्व मिळतं. ही भाजी कफाचा नाश करणारी आहे. खरोखरच अतिशय स्वस्तात मिळणा:या अळूच्या पानांमधील औषधी गुणधर्म अमूल्य आहेत. पावसाळ्यात प्रत्येकानं अळूची भाजी खायलाच हवी अशी योजनाच व्रतांमधून करून ठेवलेली आहे. हे फारच आश्चर्यकारक सत्य आहे.
भारंगी
पावसाळी आजारांवरचा उपाय
भारंगीची पानं दंतूर कडा असणारी असतात. ही भाजीसुद्धा पावसाळ्यात मिळते. ही चवीला किंचित कडू व गुणांनी उष्ण असते. पचनास हलकी व भूक वाढवणारी असते. शरीरावरील सूज कमी करण्याचे गुणधर्म या भाजीत आहेत. सर्दी-ताप-खोकला या पावसाळी आजारांवर औषधी गुणधर्मानं कार्य करते. म्हणून पावसाळी वातावरणात भारंगी म्हणजे पथ्याची भाजी समजली जाते.
कुरडू
मुतखडय़ावरचा इलाज
कुरडूला पांढ:या रंगाचे तुरे येतात. ही भाजी मूत्रजनन आहे. मुतखडय़ात लघवी होताना त्रस होतो. तो त्रस कुरडूच्या सेवनानं कमी होतो. ही भाजी गुणांनी थंड आहे. काही ठिकाणी लाल रंगाच्या तु:यांचीही वेगळी जात मिळते.
चंदनबथुआ/चाळवत
सदैव पथ्यकर
ही भाजी तीन प्रकारात मिळते. हिरव्या पानांची, लाल पानांची व किंचित सुगंधी पानांची हे तीन प्रकार आहेत. संस्कृतात चंदनबथुआला वास्तुक किंवा हंसपदी असे म्हणतात. याची पानं हंसाच्या पायाप्रमाणो असतात. आयुव्रेदात या भाजीचे विशेष गुणगान केलेलं आहे. दीर्घायुष्य प्राप्त करून देणारी म्हणून ती सर्व पालेभाज्यांत श्रेष्ठ आहे. ही भाजी पावसाळ्यात शेताच्या बांधावर सहज उगवते. या भाजीत नैसर्गिक क्षार व आम्लता असते. त्यामुळे ती फार रुचकर लागते. कृमींचा नाश करणारी, सारक गुणधर्मानं मलावरोध नष्ट करणारी व व्रणांना चटकन भरून काढणारी आहे. वात-पित्त व कफ या तिन्हीही दोषांचे विकार दूर करणारी व सदैव पथ्यकर अशी ही भाजी आहे.
आंबट चुका
वातनाशक थंड भाजी
ही पावसाळ्यात सहज उगवते.
ही भाजी तोंडाला रुची प्राप्त करून देते.
ही भाजी गुणांनी थंड व पचनास
हलकी आहे. शरीराचा दाह कमी
करणारी थंड व मूत्रल आहे. ही
भाजी वातनाशक आहे. पावसाळ्यात जुलाबावर औषध म्हणूनही हिचा वापर होतो.

