दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरापेक्षा पश्चिम उपनगरात शुक्रवारी पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकत होती. तर, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गासह इतर रस्त्यांवरील खड्डय़ांचे प्रमाण वाढल्याने या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या.
पश्चिम उपनगरात कांदिवली, जोगेश्वरी, दहिसर, मालाड, गोरेगाव, अंधेरी आणि वांद्रे येथील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकाला खड्डय़ांचा अंदाज येत नाही. त्यामुळे खड्डय़ांमध्ये आदळून वाहनांचे नुकसान होत आहे.पूर्व द्रुतगती महामार्गावर भांडूप ते गांधी नगर, ऐरोली टोल नाका येथे शुक्रवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. जोगेश्वरी – विक्रोली लिंक रोडवरून (जेव्हीएलआर) जोगेश्वरी, पवई परिसरात जाण्यासाठी प्रवाशांना दोन तासांचा वेळ लागत होता. वाकोलावरून कलिनाच्या दिशेने एकाच ठिकाणी १५ मिनिटे वाहने थांबली होती.
