अतिवृष्टीमुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टय़ा दिल्या जात आता चक्क विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही दोन दिवसांची सुट्टी जाहीर झाली आहे. सोमवार आणि मंगळवारी (३१ जुलै आणि १ ऑगस्ट) विधिमंडळाचे सत्र न घेण्याचा निर्णय गुरुवारच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा हे या सुट्टीचे खरे कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुरवणी मागण्या आणि विनियोजन विधेयकाला मंजुरी हे पावसाळी अधिवेशनातील सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय मार्गी लागले आहेत. त्यामुळे अधिवेशन शुक्रवारीच गुंडाळावे या दृष्टीने खटपट सुरू होती. अतिवृष्टी, पुरामुळे आमदार मतदारसंघांमध्ये परतले आहेत. याचा आमदारांच्या उपस्थितीवर परिणाम होत असल्याचे कारण पुढे केले गेले होते. मात्र, याबाबत सत्ताधाऱ्यांमध्येही मत्तांतर असल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पूर्णवेळ कामकाज व्हावे, या मताचे होते. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीही अधिवेशन गुंडाळण्यास विरोध केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अनुक्रमे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समिती बैठकांमध्ये नियोजित तारखेपर्यंत, म्हणजे ४ ऑगस्टपर्यंत अधिवेशन सुरू ठेवावे, असे ठरले. मात्र, सोमवार-मंगळवारी सुट्टी देऊन केवळ बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस कामकाज चालवावे, असा निर्णय झाला.
