पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीमध्ये वाढ करताना आता प्रतिकुटुंब १० हजार रुपयांची मदत केली जाईल. अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही ही मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळात केली.
राज्य आपत्ती प्रतिसाद मदतनिधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली तरी, अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मदत दिली जाईल, असेही पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले. उद्या, मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
राज्यभरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे अतिवृष्टी होत असताना अजूनही काही जिल्ह्यांत पाऊस झालेला नाही. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला असून त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच भाजपचे संजय कुटे यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणताना, पूरबाधितांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
तर विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या विषयावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करताना बाधितांना त्वरित मदत करण्याची मागणी केली. त्यावर सरकार शेतकरी आणि राज्यातील जनतेच्या पाठीशी असल्याचे सांगत पवार यांनी मदतीची घोषणा केली.पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत. बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल याकरिता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा.
शिवमंदिरातील प्रवेशप्रकरणी चौकशी
त्र्यंबकेश्वर येथील संदल मिरवणुकीच्या वेळी काही युवकांनी शिव मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असताना तेथील सुरक्षारक्षकांनी मनाई केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमण्यात आले असून, त्याचा अहवाल एक महिन्यात जाहीर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले.
एनडीआरएफचे केंद्र रायगडमध्येच : रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत, याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे (एनडीआरएफ) केंद्र ( बेस कॅम्प) रायगड जिल्ह्यातच होईल. यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहितीही पवार यांनी सभागृहात दिली. हे केंद्र गोव्यात हलविण्यात येणार असल्याबद्दल भास्कर जाधव यांनी सरकारचे लक्ष वेधले होते.
