माणुसकीला सलाम! इर्शाळगडावर अडकलेल्या मुक्या प्राण्यांसाठी सरसावले अनेक हात!

आपण अनेकदा समाजातली माणुसकी संपल्याची चर्चा ऐकत असतो. अनेकदा यावरून प्रचंड उद्वेग आणि नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते. पण कोणत्याही मोठ्या संकटाच्या काळात खऱ्या माणुसकीचं दर्शन घडतं. हे आजपर्यंत असंख्य उदाहरणांमधून दिसून आलं आहे. मग तो मुंबईतला पूर असो, करोनाची महासाथ असो किंवा मग दहशतवादी हल्ल्यांसारख्या भीषण घटना असोत. रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडावरील इर्शाळवाडीवर दरड कोसळली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनीच मदतकार्यासाठी धाव घेतली. पण याही गडबडीत एकीकडे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना काढायची धडपड चालू असताना तिथेच अडकलेल्या मुक्या प्राण्यांना वाचवण्यासाठीही काहीजण धावले!

इर्शाळवाडीवर गुरुवारी रात्री दरड कोसळली. उण्यापुऱ्या ४८ घरांच्या या वाडीतली २५ ते ३० घरं दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचं खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेतल्या निवेदनात सांगितलं. १५० ते २०० व्यक्की ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हे वृत्त प्रकाशित करेपर्यंत एनडीआरएफला २१ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. दुसऱ्या दिवशीही इर्शाळगडावर एनडीआरएफची चार पथकं बचावकार्य करत आहे. पण एकीकडे जवळच्या माणसांना गमावल्याचा टाहो गावकरी फोडत असताना दुसरीकडे मुक्या प्राण्यांची मात्र कुठेच चर्चा नव्हती. पण त्यांना वाचवण्यासाठी आता दुर्गप्रेमी सरसावले आहेत.

 इर्शाळगडावरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे एनडीआरएफचे जवान मोठ्या हिकमतीने निसर्गाच्या रौद्ररुपासमोर बचावकार्य करत असताना दुसरीकडे काही दुर्गप्रेमींनी मुक्या जनावरांचा शोध सुरू केला. काही दुर्गप्रेमींनी एका चिखलात अडकलेल्या बैलाला वाचवल्याचा हा व्हिडीओ नेटिझन्सची दाद मिळवून जातोय!

दुर्गसेवक राजेश सदाशिव भोर नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एक बैल चिखलात अडकला असून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न काही लोक करताना या व्हिडीओत दिसत आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर शेवटी या बैलाला तिथून बाहेर काढून उचलूनच दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. थोडी हुशारी आल्यानंतर अखेर हा बैल उठून उभा राहिला आणि आसपासच्या लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

इर्शाळगडावर अजूनही बचावकार्य चालूच असून अडकलेल्या माणसांबरोबरच अडकलेल्या मुक्या जनावरांनाही वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *