वरळीतील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत आमदारांची समिती ; उदय सामंत यांची घोषणा

विकासकामांमुळे बाधित वरळीतील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत मुंबईतील आमदारांची समिती स्थापन करणार असल्याची घोषणा  उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली. ‘पुनर्वसनाशिवाय  पुनर्विकास नाही’, असे शासनाचे धोरण आहे. बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्यासाठी आमदारांची समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती  सामंत यांनी दिली.  वरळी येथील रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित अनिवासी गाळेधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात  सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

वरळी भागातील डॉ.ई. मोजेस मार्ग, गणपतराव कदम मार्ग व केशवराव खाडे मार्गावर रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे असून कमीत कमी लोक बाधित होतील असा प्रयत्न केला जाईल. त्यांचे पुनर्वसन झाल्यानंतरच पुनर्विकासाचे काम सुरू होईल, असेही सामंत  यांनी स्पष्ट केले. येथील बाधित गाळेधारकांची सध्या मुंबई महानगपालिकेकडून पात्र, अपात्रता निश्चित करण्याचे काम सूरू आहे. रस्त्याचे रुंदीकरण करताना शंभर फुटांच्या रस्त्याची आवश्यकता आहे का, हे तपासून पाहिले जाणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले. बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी आमदारांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.  या समितीमध्ये स्थानिक आमदारांचा समावेश असेल. त्यामुळे पक्षनिहाय एका आमदाराची या समितीमध्ये निवड करण्यात येईल. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने एका आमदाराचे नाव द्यावे, असे सामंत यांनी म्हणताच सभागृहात  हशा पिकला. वरळीत आदित्य ठाकरे यांच्यासह आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे असे ठाकरे गटाचे तीन आमदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *