रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषा अनिवार्य याचा अर्थ त्यांनी साहित्यिक व्हावं असं नाही. तर इच्छुकांना मराठी बोलता यावं, इतकीच माफक अपेक्षा आहे, असं स्पष्टीकरण राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी दिलं आहे.
यापुढे ज्यांना मराठी भाषा बोलता येते, त्यांनाच रिक्षा परवाना देण्याची घोषणा दिवाकर रावते यांनी काल केली. येत्या नोव्हेंबरपासून नवे परवाने वितरित होण्याची शक्यता आहे.
” रिक्षाचा परवाना कोणालाही मिळेल. तो कोणत्याही जाती, धर्म अथवा प्रांताचा असेल, तरीही त्याला परवाना मिळेल. मात्र यासाठी तो महाराष्ट्रातील गेल्या 15 वर्षांपासूनचा रहिवाशी असावा. तसंच त्याला मराठी बोलता यावं इतकीच अट आहे”, असं रावते म्हणाले.
रिक्षा चालकांना स्थानिक प्रवाशांनाच ने- आण करावी लागते. त्यामुळे त्यांना मराठी भाषा यावी ही अट घालणं यात चूक काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच आम्ही रिक्षा चालकांना साहित्यिक, मराठी तज्ज्ञ व्हा असं म्हणत नसल्याचंही रावते म्हणाले.

