विक्रोळीत संरक्षक भिंत खचल्यामुळे चार घरे कोसळली

विक्रोळीमधील पार्कसाईट परिसरात शुक्रवारी सकाळी संरक्षक भिंत खचल्याने चार घरे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. अनेक भागात गुरूवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत होता. पावसाच्या तडाख्यात विक्रोळी पार्कसाईट येथील वर्षा नगर परिसरातील संरक्षक भिंतीला मोठ्या प्रमाणत तडे गेले. ही बाब काही रहिवाशांच्या लक्षात येताच तात्काळ त्यांनी कुटुंबासह घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

मात्र शुक्रवारी सकाळी चार घरे पूर्णपणे कोसळली. घटनेचे वृत्त समजताच महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आसपासची धोकादायक बनलेली घरे रिकामी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *