मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत ११ सीबीएसई शाळा सुरू केल्या असून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने या शैक्षणिक वर्षापासून आणखी तीन सीबीएसई शाळा मुंबईत सुरू केल्या आहेत. यापैकी दोन शाळा चेंबूरमध्ये, तर एक शाळा कांदिवलीत आहे. चेंबूरमधील महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांची संख्या तीन झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेने २०२० मध्ये जोगेश्वरी पूर्व येथील पूनमनगरमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पहिली सीबीएसईची शाळा सुरू केली. या शाळेला मिळालेला प्रतिसाद पाहून महानगरपालिकेने आर्थिकदृट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई अन्य ठिकाणी सीबीएससीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. महानगरपालिकेने २०२१ मध्ये आणखी दहा ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू केल्या. तसेच आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज आयजीसीएसई या बोर्डांची प्रत्येकी एक शाळा सुरू केली. या शाळांना वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन गेल्यावर्षी महानगरपालिकेने सीबीएसई शाळेतील छोटा शिशू व बालवाडी वर्गाची एकेक तुकडी वाढवली होती. त्यामुळे ९६० जागा वाढल्या होत्या. मात्र तरीही सीबीएसई शाळांची मागणी वाढत असून मुंबईत आणखी सीबीएसई शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.
