मुंबईमध्ये पावसाळी आजाराचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली असतानाच आता पुन्हा गोवरने डोके वर काढले आहे. मुंबईमध्ये बुधवारी गोवरचे सात निश्चित, तर पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला पावसाळी आजारांपाठोपाठ आता गोवरचाही सामना करावा लागणार आहे.
मुंबईमध्ये गतवर्षी सप्टेंबरमध्ये गोवरचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला होता. मुंबईतील गोवरची स्थिती गंभीर झाली होती. याची जागतिक आरोग्य संघटनेनेही दखल घेतली होती. त्यानंतर मुंबईतील गोवरची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याला साधारणपणे जानेवारीमध्ये यश येऊन गोवरची रुग्णसंख्या आटोक्यात आली. मात्र आता सहा महिन्यांनंतर जुलैमध्ये पुन्हा गोवरचे सात रुग्ण सापडले आहेत.
मात्र या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले नाही. तसेच मुंबई महानगरपालिकेकडून घरोघरी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणादरम्यान ताप व पुरळ आलेले गोवरचे पाच संशयित रुग्ण सापडले आहेत. या पाचही संशयित रुग्णांना जीवनसत्त्व अ ची मात्रा देण्यात आली आहे.
