‘भाव’ खाणाऱ्या टोमॅटोच्या शेतावर चोरांचा दरोडा, शेतकऱ्याचं २.५ लाखांचं नुकसान

सध्या किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वाढले आहेत. वाशी (नवी मुंबई) एपीएमसीत होणारी आवक कमी होत आहे. सोमवारी घाऊक बाजारात प्रतिकिलो २० रुपयांनी दरवाढ झाली असून घाऊक बाजारात टोमॅटोची किंमत ७०-८० रुपये तर किरकोळ बाजारात १२०-१५० रुपयांवर गेली आहेत. महाराष्ट्रासह देशभरात टोमॅटोच्या किंमतींनी १२० रुपयांचा टप्पा पार केला आहे. यंदा टोमॅटो उत्पादन कमी असल्याने पुढील कालावधीत टोमॅटोचे दर गगनाला भिडणार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या काळात घाऊक बाजारातील टोमॅटोची किंमत १०० रुपयांच्या पुढे जाऊ शकते अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दरम्यान, टोमॅटोचा वाढलेला भाव पाहून आता चोरांची नजर टोमॅटोंवर आहे. कर्नाटकात एका शेतातल्या तब्बल अडीच लाख रुपयांच्या टोमॅटोंची चोरी झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे.

कर्नाटकमधल्या हासन जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा आरोप आहे की, त्याच्या शेतातल्या २.५ लाख रुपयांच्या टोमॅटोंची चोरी झाली आहे. चोरांनी थेट शेतातूनच टोमॅटो चोरून नेले आहेत. ही चोरी ४ जुलै रोजी रात्रीच्या वेळी झाली आहे.

येथील महिला शेतकरी धारिणी आणि तिच्या कुटुंबियांनी त्यांच्या दोन एकर जमिनीवर टोमॅटो लावले होते. शेतात चांगलं पीकही आलं होतं. टोमॅटो विक्रीस तयार झाले होते. बंगळुरूच्या बाजारपेठेत टोमॅटो १२० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. एक दोन दिवसात टोमॅटो तोडून बाजारात विकायला नेण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु त्याआधीच चोरांनी शेतातले सगळे टोमॅटो तोडून नेले आहेत.

धारिणी यांनी सांगितलं की, त्यांनी कर्ज घेऊन त्यांच्या शेतात टोमॅटोचं पीक घेतलं होतं. शेतात चांगलं पीक आलं होतं, दुसऱ्या बाजूला टोमॅटोला बाजारात चांगला दरही मिळतोय. त्याआधीच सगळे टोमॅटो चोरीला गेले आहेत. धारिणी यांनी सांगितलं की, चोराने त्यांच्या शेतातले ५० ते ६० किलो टोमॅटो तोडून नेले आहेत. तसेच त्याने संपूर्ण पिकाचं नुकसानही केलं आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

धारिणी यांनी याबाबत स्थानिक हलेबिडू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हलेबिडू पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत सांगितलं की, “आम्ही सुपारी आणि इतर व्यावसायिक पिकांच्या चोरीबद्दल ऐकलं होतं, परंतु कोणी टोमॅटो चोरल्याचं ऐकलं नव्हतं. आमच्या पोलीस ठाण्यात टोमॅटोसारख्या पिकाच्या चोरीची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *