बुलढाणा या ठिकाणी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात झाला. या अपघातात २५ जण ठार झाले आहेत. या घटनेत मृतदेह जळाले आहेत त्यामुळे त्यांची ओळख पटवण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. कारण जेव्हा बस डिव्हायडरला धडकली त्यानंतर ती उलटली आणि तिने पेट घेतला. बस पेटल्यामुळे डिझेलच्या टाकीचाही स्फोट झाला. प्रवासी होरपळले आणि त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर आहे आम्ही त्याची चौकशी करत आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच मृतदेहांची ओळख पटवण्यासाटी डीएनए टेस्टिंग केलं जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळ एक दुर्दैवी आणि भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्सची बस पोलवर कोसळली आणि या बसची डिझेलची टाकी फुटली. या बसला आग लागली. या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. आठ जण वाचले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. २५ जणांचे मृतदेह हे पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आहेत. मृतदेह ओळखण्यासाठी डीएनए टेस्टिंग करावं लागणार आहे. जर घरातले लोक मृतदेहाची ओळख पटवू शकले तर पोस्टमॉर्टेमनंतर त्यांना मृतदेह देण्यात येतील. ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागणार आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
