बस नवीन होती, चालक अनुभवी होता पण अनर्थ.. विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक,एजंट म्हणाले..

समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. बस पहिल्यांदा दिशादर्शक खांबाला धडकली. त्यानंतर ती बस दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसला आग लागली. या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताबद्दल विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र धरणे यांनी माहिती दिली आहे.

 वीरेंद्र धरणे यांनी ही बस नागपूरहून ५ वाजता निघाली होती, यवतमाळचे ३, नागपूरचे ७ ते ८, वर्धा येथील १४ प्रवासी होते, अशी माहिती दिली. ही बस आम्ही जानेवारी २०२० मध्ये विकत घेतली होती. लॉकडाऊनच्या काळात बस बंद होती. गाडीची कागदपत्रं व्यवस्थित होती. गाडीचा फिटनेस होता. गाडीचा इन्शुरन्स होता. गाडीवरचा चालक आहे तो जुना चालक आहे. तो अनुभवी चालक आहे, अशी माहिती देखील धरणे यांनी दिली.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका

गाडीचा फिटनेस योग्य आहे, आताच केलेला आहे याबाबत शंका नाही. हा अपघात का झाला? समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका दिसत आहे. आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे. पूर्ण अपघाताची आम्ही शहानिशा करणार आहे. यवतमाळमधून ३ प्रवासी, नागपूरमधून ७ ते ८ आणि वर्धा जिल्ह्यातील १४ प्रवासी होते, असं वीरेंद्र धरणे यांनी म्हटलं.

वर्धा येथील १४ प्रवासी: विनायक नागापुरे

वर्धा येथील पराग ट्रॅव्हल्स एजन्सीच्या एजंटनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये वर्धा येथून साडे सात वाजता १४ प्रवासी बसले होते. ही गाडी पुण्याकडे निघाली होती. रात्री दीडच्या सुमारास अपघात झाल्याचा फोन आला. मी प्रवाशांशी संपर्क करण्याचा फोन केला पण संपर्क झाला नाही. त्यानंतर वर्धा शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली.रात्रीपासून पाच ते सहा जणांच्या नातेवाईकांशी संपर्क केल्याची माहिती वर्धा येथील एजंट विनायक नागापुरे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *