जीभेचं ऑपरेशन करण्याऐवजी अडीच वर्षांच्या मुलाची सुंता केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; डॉक्टर म्हणाले…

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बरेली येथील एका लहान मुलाला जीभेच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टराने लहान मुलाची सुंता केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी आणि हिंदू संघटनांनी रुग्णालयात गोंधळ घातला. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

बारादरी पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या संजय नगर येथे ही घटना आहे. येथील हरिमोहन यादव यांच्या अडीच वर्षीय मुलाला बोलण्याचा त्रास होता. यासाठी मुलाच्या जीभेचं ऑपरेशन करण्यास सांगितलं होतं. ऑपरेशनसाठी मुलाला बरेली स्टेडियम येथील डॉ. एम खान रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, “डॉक्टरांनी कोणतीही माहिती न देता सुंता केली,” असा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.

या आरोपांवर रुग्णालयाचे संचालक जावेद खान म्हणाले की, “मुलाच्या गुप्तांगात संसर्ग झाला होता. याची माहिती मुलाच्या आई-वडिलांना दिली होती. याबाबत आम्ही ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. ऑपरेशन करण्यापूर्वी आई-वडिलांशी चर्चा देखील केली. ऑपरेशन केल्यानंतर मुलाला सुस्थितीत आई-वडिलांच्या ताब्यात दिलं.”

“मात्र, कुटुंबीयांनी गोंधळा घालण्यास सुरुवात केली. कुटुंबीय ज्याला सुंता समजत आहे, तो एक कट आहे. संसर्ग रोखण्यासाठी हा कट केला आहे. कट केला नसता, तर संसर्ग संपूर्ण शरीरात पसरला असता,” असं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलं.

याची माहिती मिळताच हिंदू संघटनांनी रुग्णालयात गाठलं. हिंदू संघटनांनी आरोप केला की, “रुग्णालयात धर्म परिवर्तन करण्यात येत आहे. डॉक्टरने जाणूनबुजून हिंदू मुलाची सुंता केली आहे.”

याप्रकरणी बरेलीचे पोलीस अधिकारी राहुल भाटी यांनी सांगितलं की, “डॉ. एम खान रुग्णालयात अडीच वर्षाच्या मुलाला जीभेच्या ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण, कुटुंबीयांनी आरोप केली जीभेच्या ऑपरेनशऐवजी मुलाची सुंता करण्यात आली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपासानंतर कारवाई केली जाईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *