विलेपार्लेमध्ये घर कोसळून दोघांचा मृत्यू; दोन जण जखमी

विलेपार्ले गावठाण येथील सेंट ब्राझ रोडवरील नानावटी रुग्णालयाशेजारी रविवारी दुपारी एका दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा सज्जा आणि तळमजल्याचा काही भाग कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले.

दुमजली इमारतीच्या तळमजल्याचा काही भाग आणि पहिल्या मजल्याचा सज्जा कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन फायर इंजिन, एक प्रतिसाद वाहन, १०८ रुग्णवाहिका, पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच प्रिशिला मिसौता (६५) या महिलेचा आणि रोबी मिसौता (७०) यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये सुमित्रादेवी (५३) यांची प्रकृती स्थिर आहे, तर आणखी एक व्यक्ती जखमी असून, तिची ओळख पटलेली नाही, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

विद्याविहार येथे दुमजली बंगला खचला

मुंबई : विद्याविहार पूर्वेला असलेल्या चित्तरंजन कॉलनीत एक दुमजली बंगला आठ ते दहा फूट खाली खचल्याची घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. यामध्ये ८० वर्षीय महिलेसह तिचा मुलगा अडकला असून रात्री उशिरापर्यंत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.   विद्याविहार येथील राजावाडी रुग्णालय परिसरात ही चित्तरंजन कॉलनी आहे. या कॉलनीत असलेला एक बंगला सकाळी नऊच्या सुमारास अचानक सात ते आठ फूट खाली खचला. या बंगल्यात दोन कुटुंब राहत असून बंगला खचताच काही जणांनी तत्काळ बाहेर धाव घेतली. तर, यामध्ये सहा जण अडकले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस आणि पालिका अधिकारी हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *