बेस्ट बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

गिरगावमधील गायवाडीजवळ रस्ता ओलांडताना एका ८४ वर्षीय वृद्ध महिलेला बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बसची बुधवारी सायंकाळी धडक बसली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. बेस्ट बस मार्ग क्रमांक ६६ ची बस बॅलार्ड पिअर येथून शीव बस स्थानकाच्या दिशेने जात होती.  त्या वेळी अरुणा जाडये (८४) यांना बसची धडक बसली.

अपघातात अरुणा यांच्या छातीला आणि बरगडय़ांना गंभीर दुखापत झाली होती.  त्यांना उपचारासाठी ताडदेव येथील भाटिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा रात्री ९.३० च्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी बस चालक संदीप परब (४७) याला व्ही. पी. रोड पोलिसांनी ताब्यात घेतले. बेस्ट उपक्रमामधील बसच्या अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मृत्यू आणि जखमींच्या संख्येत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षांत बेस्ट बस अपघातात एकूण १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी पाच जणांचा मृत्यू जूनमध्ये झाला आहे. तर, गेल्या वर्षभरात १० जीवघेणे अपघात झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *