मध्य रेल्वेचा सांडपाणी प्रक्रियेवर भर; ६ टक्के पिण्याच्या पाण्याची बचत

उन्हाची काहिली आणि लांबणीवर पडलेला पाऊस यामुळे अनेक भागात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. तसेच वाढत्या सांडपाण्यामुळे जलप्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी करण्यात येत आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा अन्य कामांसाठी होणारा वापर कमी झाला असून पिण्याच्या पाण्याच्या वापरात प्रतिदिन सुमारे ६.३ टक्क्यांची बचत होत आहे.

मध्य रेल्वेच्या पर्यावरण व गृह व्यवस्थापन विभागाने २०२० मध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या पाच प्रकल्पांची उभारणी केली. गेल्या वर्षी प्रतिदिन १,५७५ किलोलिटर (केएलडी) पाणी निर्माण करण्याची  क्षमता असलेले १० नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. आतापर्यंत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ हून अधिक जलशुद्धीकरण संयंत्रे उभारण्यात आली असून या प्रकल्पांमुळे प्रतिदिन एक कोटी लिटरहून अधिक पाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे प्रत्येकी १२० केएलडी क्षमतेचे दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत. अहमदनगर येथे ५० केएलडी, नाशिक येथे २०० केएलडी, अकोला येथे ५०० केएलडी, खांडवा येथे ५०० केएलडी, अजनी ४० केएलडी, सोलापूर, कोपरगाव  आणि साईनगर शिर्डी येथे प्रत्येकी १५ केएलडी क्षमतेची सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत.

मध्य रेल्वे प्रशासनाने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने पाऊल टाकले असून वेगवेगळी पर्यावरणपूरक कामे करण्यात येत आहेत. जलसंधारणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) आणि रेल्वे मंडळाने जारी केलेल्या नियमांनुसार कामे करण्यात येत आहेत. या उपाययोजनांमुळे मध्य रेल्वेच्या पिण्याच्या पाण्याच्या वापरात प्रतिदिन ६.३ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

येथे होतो प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापर करण्यात येत आहे. फलाट, स्थानकांवरील दुकाने, रेल्वेचे डबे यांची स्वच्छता करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात येत आहे. रेल्वेची उद्याने, स्वच्छतागृहांमध्येही या पाण्याचा वापर करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *