मुंबई महानगरपालिकेने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृहात १६ ते ३० जून या कालावधीत जिवंत म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांचा बाजार भरविण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हैसवर्गीय प्राण्यांचा धार्मिक वध केवळ देवनार पशुवधगृहातच करणे बंधनकारक आहे, अशी सूचना मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. मुंबईत इतरत्र कोठेही सदर प्राण्यांचा धार्मिक वध करता येणार नाही. अनधिकृपणे पशुवध करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृहात विविध यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा आणि पूर्वतयारीबाबत अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीला राज्य पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त डॉ. कांबळे, महानगरपालिका उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) राजू भुजबळ, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक कलीमपाशा पठाण, अग्निशमन दल व वाहतूक पोलीस आणि अन्य संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
