राष्ट्रवादीच्या ‘जेलभरो’ आंदोलनाचा आज दुसरा दिवस

राष्ट्रवादीच्या ‘जेलभरो’ आंदोलनाचा आज दुसरा दिवस

दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेलभरो आंदोलनाचा आज दुसरा दिवस असणार आहे. मराठवाड्यानंतर आज (मंगळवारी) संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात नाशकात जेलभरोची सुरुवात होणार आहे.

शेतकर्‍यांचं कर्ज माफ करा आणि दुष्काळ जाहीर करा या मागण्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसने काल (सोमवारी) संपूर्ण मराठवाड्यात जेलभरो आंदोलन केलं होतं. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, लातूर, बीड, हिंगोली, उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. स्वत: सुप्रिया सुळेंनी जालन्यामध्ये आंदोलनाचं नेतृत्व केलं. पोलिसांनी त्यांना काही वेळासाठी ताब्यात घेतलं होतं. तर मुंबईतही सचिन अहिर, किरण पावस्कर आणि राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन केलं. पोलिसांनी त्यांच्यासह 250 ते 300 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळातच सोडून दिलं. धनंजय मुंडे आंदोलनासाठी परभणीमध्ये हजर होते. तर दुसरीकडे नांदेडमध्ये माजी मंत्री अनिल देशमुख आणि कमल कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे शहरातली वाहतूक विस्कळीत झाली होती. मराठवाड्यातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेलभरो आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *