मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात पाऊस झाला नसल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे. पावसाळा संपायला १५ दिवस शिल्लक आहेत. मात्र, मुंबईकरांना वर्षभर पाणी पुरवण्यासाठी ४० ते ४५ हजार कोटी लिटर पाण्याचा साठा जमा होणे अवघड आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा विचार प्रशासन करत आहे.
या प्रस्तावाबरोबरच पाणीकपात वर्षभर कायम ठेवण्याचा विचार सुरू असून स्थायी समितीच्या मंगळवारच्या विशेष बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, या दोन्ही पर्यायांपैकी एका पर्यायाचा विचार करून येत्या १ ऑक्टोबर रोजी पाण्याचा आढावा घेऊनच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे बोलले जात आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा या सर्व धरणांमध्ये सध्या ९९ हजार ६१५ कोटी लिटर पाणीसाठा आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १ लाख ४० हजार कोटी लिटर पाणी लागते. अजून ४० हजार कोटी लिटर पाणी कमी पडत आहे. अवघ्या १५ दिवसांत धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा जमा नाही.
स्थायी समिती अध्यक्षांनी पाण्याच्या प्रश्नावर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी विशेष सभेचे आयोजन केले. तेव्हापासून महापालिकेचे जलअभियंता विभागाचे अधिकारी कर्मचारी भविष्यातील पाण्याच्या उपाययोजनांबाबत आराखडा तयार करण्यात येत आहे.
मुंबईत १५ टक्के कपात आहे. त्यामुळे सध्या दरदिवशी होणा-या ३७५ कोटी लिटर पाण्याच्या तुलनेत ३२० कोटी लिटर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे रोज ५० कोटी लिटर पाण्याची बचत होते. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेचे सदस्य रमाकांत रहाटे यांनी शहरात एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती.

