शाळकरी मुलीवर बलात्काराचा प्रकार चार वर्षांनी उघड

शाळकरी मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने चार वर्षांपूवी एकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळकरी मुलीची काढलेली छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली. लॉरेन्स फ्रान्सिक अँथोनी (वय ५०, रा. शांताई टॉवर, चारवाडा, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत एका २० वर्षीय पीडीत तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीने घोरपडी गावातील एका शाळेत २०१९ मध्ये शिक्षण घेत होती. त्या वेळी ती अल्पवयीन होती. शाळेतील वसतिगृहात आरोपी लॉरेन्स स्वयंपाकी होता. त्याची पीडित मुलीशी ओळख झाली होती. पिंपरी-चिंचवड शहरात आम्ही वसतिगृह सुरू करणार आहोत. वसतिगृहात चांगल्या सुविधा देणार असल्याची बतावणी करुन लॉरेन्स तिला घरी घेऊन गेला होता. पत्नी आणि मुले घरी नसताना त्याने तिच्यावर अत्याचार केला. लैंगिक अत्याचाराचे मोबाइलवर चित्रीकरण केले होते. चित्रीकरण समाजमाध्यमात प्रसारित करू, अशी धमकी त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केले. तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक सागर भापकर आणि कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *